विद्यार्थ्यांच्या ‘सायबर राखी’तून डिजिटल सुरक्षेचा संदेश
1 min read
विद्यार्थ्यांच्या ‘सायबर राखी’तून डिजिटल सुरक्षेचा संदेश
जळगाव : रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला सायबर जनजागृतीची जोड देत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, Quick Heal Foundation आणि QHF Cyber Warriors Club, Jalgaon यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः ५० आकर्षक DIY राख्या तयार केल्या. पारंपरिक राखीला आधुनिक स्वरूप देत प्रत्येक राखीवर विविध सायबर फसवणुकींपासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुरक्षा सूचना लिहिण्यात आल्या. यासोबतच Anti-Fraud App चा QR Code देऊन नागरिकांना सायबर सुरक्षेशी संबंधित उपयुक्त माहितीपर्यंत सहज पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या राख्या वाहतूक पोलिस तसेच ज्वेलर्सना बांधल्या. राखी बांधण्यासोबतच विद्यार्थ्यांनी OTP, UPI PIN, संशयास्पद लिंक, बनावट कॉल आणि ऑनलाइन फसवणूक याबाबत थोडक्यात जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांनी रक्षाबंधनाच्या भावनेला एक सामाजिक संदेश दिला. “सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचे संरक्षण करणे हीदेखील आजच्या काळातील जबाबदारी आहे,” हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.
पारंपरिक सणाचा उपयोग समाजोपयोगी जनजागृतीसाठी करण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचा भाग ठरला. सर्जनशीलतेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून करण्यात आले.
— QHF Cyber Warriors Club, Jalgaon


